महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त धिरज कुमार सर (IAS) यांनी आज मावळमध्ये येऊन मावळातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत अनेक महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा झाली. ‘मावळातील प्रमुख पिक असलेल्या इंद्रायणी तांदुळाला अधिक दर्जेदार बनवुन जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर निर्यात करुन येथील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी भेटी दरम्यान प्रामुख्याने सांगितले.
सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन स्थानिक शेतकऱ्यांचे गट करून सेंद्रीय शेतीस चालना देणे. प्रशिक्षण,अभ्यास दौरे यासह विक्रीपर्यंतचे मार्गदर्शन करणे, शेतमालाला हमीभाव देणे, शेतीपुरक व्यवसायांना तालुक्यात चालना देणे, स्थानिक बाजारपेठ सक्षम करणे आदि विषयांवर सखोल चर्चा झाली.
एकीकडे शहरी माणसाला गावाकडच्या मातीची ओढ आहे. तर ग्रामीण भागात शेतीसोबत पूरक व्यवसायाची गरज आहे या दोन्ही गोष्टींची सांगड घालणारी ‘कृषी पर्यटनाची’ संकल्पना रुजवली पाहिजे. शहरी लोकांना ग्रामीण जीवन व ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबर शेतीमध्ये विविध प्रयोग व त्याचबरोबर शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीचे प्रयोग यशस्वी केले पाहिजेत. कृषी पर्यटन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास ग्रामीण भागाचा कायापालट नक्कीच होईल. त्यासाठी कृषी पर्यटन धोरण फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात उतरायला हवे. शहरी नागरिकांना संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच शेतकऱ्यांना उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा व्यापक दृष्टिकोन यातुन मिळेल.
कृषी उत्पादनात संपन्न असलेल्या आपल्या मावळ तालुक्यात प्रक्रिया उद्योग, साठवणूक यामध्ये भरपूर वाव आहे. शेतीमालावर प्रक्रिया झाली तर ती शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारी ठरणार आहे. शेती क्षेत्रातील अस्थिरतेमुळे आधुनिक शेती, सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांमध्ये जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी माती परीक्षण, पाणी परीक्षण, पर्जन्यमान याची सांगड घालून त्यानुसार पिके घेतली जावी.शेती संशोधन केंद्रे शेतकऱ्यांना फायदेशीर होण्यासाठी ती शेतकरीभिमुख कशी होतील यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. शेतीतील आव्हानांना यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी शेती व्यवसायात आता आधुनिक तंत्रज्ञानाची तसेच अद्ययावत व्यवस्थापन तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे यातून शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढेल, याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता सकारात्मक व्हायला हवा.
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मावळातील ग्रामीण जीवन शैलीचा अभ्यास करून ती जगापुढे आणणे, इंद्रायणी तांदूळाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी तांदूळ महोत्सवाचे आयोजन करणे, कृषी पर्यटन केंद्रे विकसित करणे, मावळातील पर्यटनाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याविषयी चर्चा झाली.