कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मा.जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी संपुर्ण मावळ तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेसह प्रशासनाच्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
लोणावळा येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन त्या ठिकाणच्या सोयी सुविधांची पाहणी केली. तेथील रुग्णांशी, डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक करत मनोबल वाढविले. तसेच लोणावळ्यातील प्रतिबंधित क्षेत्र गवळीवाडा येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. कान्हे ग्रामीण रुग्णालयात कोविड समर्पित आरोग्य केंद्र आवश्यक सुविधा आणि वैद्यकीय सामुग्रीसह चालू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. देहुरोड कॅन्टोमेन्ट बोर्ड येथील आढावा घेतला.
मायमर हॉस्पिटल मध्ये झालेल्या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक सोयी-सुविधां मध्ये वाढ करावी. बेडची संख्या वाढवून रुग्णांना वेळेत योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. सर्वसामान्य नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा अधिक लाभ मिळावा. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे अंत्यसंस्कार करताना पीपीई किट, सुरक्षा साधने इ.खर्च न घेता अंत्यसंस्कार मोफत करावे, अशा प्रमुख सूचना यावेळी केल्या.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, मावळ तालुक्यात रुग्णांच्या तपासणीचे काम वाढविण्यात येईल. तसेच ऑक्सिजन बेडची संख्याही वाढविण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे.भरारी पथकामार्फत नियमांची अंमलबजावणी न करणार्यांच्या विरोधात कारवाई करावी. ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे. जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचे निर्देश देत सद्यस्थितीत सर्व यंत्रणा उत्तमरीत्या काम करत असून येथील व्यवस्था आणि पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, आमदार सुनिल शेळके, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदिप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार, शल्यचिकित्सक नंदापूरकर, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार मधूसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी रवि पवार, देहुरोड कॅ.बोर्ड सीईओ रामस्वरुप हरितवाल तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, डॉक्टर व पदाधिकारी उपस्थित होते.