पंचायत समिती सभागृहात वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग आढावा बैठक पार पडली. वनविभागाच्या हद्दीतुन जाणार्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या रस्त्यांची, स्मशानभूमीची कामे वन विभागाच्या परवानगी अभावी गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहेत. बांधकाम विभाग व वनविभागात परस्पर समन्वय नसल्यामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा रस्त्यांना वनविभागामार्फत लवकर परवानगी द्यावी अशी सुचना यावेळी केली.
मावळ तालुक्यातील निसर्ग संपन्न असलेला बराचसा भाग हा वनविभागाच्या हद्दीत येतो. या ठिकाणी असणारी जैवविविधता, नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना नेहमी आकर्षित करते. मात्र पर्यटनस्थळापर्यंत जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होत नाही अथवा पर्यटनस्थळी पर्यटकांना सुविधा देण्यासाठी वनविभागाकडुन कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे वास्तव आहे. भौतिक सुविधांचा अभाव दिसून येतो. शौचालय बांधण्यासाठी वारंवार सूचना केल्या आहेत. तरीही संबंधित विभागाकडुन उपाययोजना केलेल्या नाहीत. टायगर पॉईंटच्या ठिकाणी रेलिंग उभारणे तसेच इतर ठिकाणी सुरक्षा कठडे उभारावे अशा सुचना संबंधित विभाग अधिकारी यांना दिल्या आहेत.
यावेळी तहसीलदार मधुसुदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, जिल्हा वन अधिकारी लक्ष्मी मॅडम, वन अधिकारी ताकवले, महेश पाटील, सा.बां.विभाग अभियंता आगळे, उपअभियंता कानडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
